मन काय असतं? एक भावना, एक समज, की, देवाने दिलेला एक मित्र? हे तर नक्की माहित नाही, पण हो.. आपल्या जगण्यात त्याचं महत्त्वाचं असतं पात्र. दिसत तर कुणालाच नसतं, तरीही त्याचं ऐकावं लागतं, त्याच्या एका इशाऱ्यावर ते संपूर्ण शरीराला कामाला लावतं. कुणी म्हणतं "आम्ही मनाचे राजे", तर कुणी म्हणतं "आम्ही मनाचे गुलाम", आपण कितीही प्रयत्न केला थांबवण्याचा तरी नाही लागत त्याच्या फिरण्यावर लगाम. नेहमी सैरभैर भटकत असतं, विचारांचे पाढे मांडत असतं, अदृश्य असूनही ते शरीरावर नेहमीच आपली हुकूमत गाजवत असतं. पण जी गोष्ट मनाने करायची ठरवली तर अशक्य ही शक्य होऊन जातं, त्यासाठी मनाला आपला मित्र बनवावं लागतं जितकी त्याची मैत्री चांगली तितकंच शत्रुत्व महाग पडतं. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मनाचे राजे व्हा, चुकून गुलाम बनलात तर पडेल तुम्हालाच महाग. असो..., मन काय असतं? हे तर नक्की मला माहित नाही, पण हो... देवाने दिलेली ती एक भेट आहे जे सुचवते प्रत्येकाला काही न काही. -अंकिता घुगे. ...
का जातो मनुष्य राऊळातल्या देवापाशी? जर खरे दैवत आहे त्याच्या स्वतःपाशी. का मनुष्याला कळत नाही, की ज्याच्या शोधात तो दिवस-रात्र भटकत राही, ते खरे दैवत म्हणजे "आई" . भाग्यशाली असते ती व्यक्ती जिच्या जवळ असते आई , पण दुर्दैवी असतो तो मनुष्य, ज्याला आई ची किंमत कळत नाही. अरे...! राऊळातला देव तरी दगडाचा असतो, पण देवाचा खरा अंश तर आई च्या रूपामध्येच सापडतो. इच्छापूर्ती होण्यासाठी देवाजवळ विनवणी करावी लागते, पण आई ला तर न सांगताच लेकरांच्या मनातील भावना समजते. आई आणि देव यांच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे, आई जवळ असूनही मनुष्य दगडात देव पाहे. आई सारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही, आ त्मा आणि ई श्वर यांचा खरा संगम म्हणजे आई.
शहर म्हणजे सुख सुविधांचा स्वर्ग, गाव म्हणजे हिरवा निसर्ग. शहर म्हणजे प्रदूषणाची दरवळ, गाव म्हणजे माणूसकीची हिरवळ. शहर म्हणजे दूषित माती, गाव म्हणजे जपलेली नाती. शहर म्हणजे बंद दारं, गाव म्हणजे मोकळं सारं. शहर म्हणजे गाड्यांचा धूर, गाव म्हणजे कोकिळेचा सुर. शहर म्हणजे इमारतींचा थवा, गाव म्हणजे मोकळी हवा. शहर म्हणजे तोडलेलं झाड, गाव म्हणजे नारळाचा उंच माड. शहर म्हणजे गर्दी अफाट, गाव म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. शहर म्हणजे डांबरीकरण, गाव म्हणजे स्वच्छ पाण्याचं धरण. शहर म्हणजे दुसर्यांचे भाडेकरी, गाव म्हणजे स्वतः शेतकरी. शहर म्हणजे औद्योगिकीकरणाची बोंब, गाव म्हणजे मातीत उगवलेला नाजूक कोंब. शहर म्हणजे पावसाला नकार, गाव म्हणजे पावसाचे उपकार. शहर म्हणजे सोडलेल्या गायी, गाव म्हणजे पाळलेल्या गायी. शहर म्हणजे डिझाईनची दारं, गाव म्हणजे सारवलेली घरं. शहर म्हणजे भाजी-पुरी, गाव म्हणजे बेसन-भाकरी. शहर म्हणजे पैसा कमवणं, गाव म्हणजे समाधानाचं जगणं. शहर म्हणजे संपत्ती, गाव म्हणजे समृद्धी. थोडक्यात... शहर म्हणजे सुख, गाव म्हणजे समाधान. ...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें