खरंच माणसातील माणुसकी आता कमी होऊ लागली

 माणसाने माणसाशी माणसासारखेच वागणे

ही माणसानेच केलेली व्याख्या

माणसालाच कधी न कळाली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


झाला कधी एखादा अपघात रस्त्यावर

तर मदत करणार्यांपेक्षा, फोटो काढणार्यांचीच

गर्दी जास्त होऊ लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


मंदिराबाहेर गरीब मुलांचं पोट भरण्यापेक्षा,

पिंडीवर दूध वाया घालायलाच माणसं

जास्त महत्त्व देऊ लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


मंदिरातील दानपेटीत टाकण्यासाठी

हजारांची नोट, पण एखाद्या गरीबाला देण्यासाठी

काढलेल्या दहा रूपयांची किंमत ही माणसाला 

जास्त वाटू लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


ओळख तर सर्वांशीच ठेवतात,

मात्र फायद्यापुरतीच माणसं एकमेकांशी

बोलू लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


आला कधी एखाद्याचा राग

तर माफ करण्याची पद्धत मोडुन

माणसं बदल्याचीच भावना मनात

ठेऊ लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


कायद्यापुढे तर सर्व माणसं समान आहेत

पण तरीही याच कायद्यातील श्रीमंतांना

आज गरीबांची लाज वाटू लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

कमी होऊ लागली.


घरातील आई-बहिणींची इज्जत

तर सर्वच जण करतात हो,

परंतु, परस्त्रीच्या इज्जतीचा तर

गल्लोगल्ली पंचनामाच करू लागली,

खरंच माणसातील माणुसकी आता

खूपच कमी होऊ लागली.

                                       -अंकिता घुगे.




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

मन काय असतं?

खरे दैवत- "आई"

शहर आणि गाव