दुष्काळ
हे देवराया, एका शेतकऱ्याचं
मागणं ऐक की रं आता,
पीकं जळू लागली पाण्यावीन
त्या पावसाला धाड़ की रं आता.
भुईची तहान आता अनावर झालीया
तिला तुच पाणी पाज की रं आता,
घामानं जीव बघ व्याकूळ झालाया
थोडी वार्याची झुळूक सोड़ की रं आता.
आरं...दाणा नाही पिकला तर आणा कुठून आणायचा
तुही याचा विचार कर की रं आता,
बायको-पोरांच्या पोटाला घास नाही
त्यांची हिरमुसली चेहरे नाही बघवतं रं आता.
आतुरतेने पाहतोय वाट त्या पावसाची
उन्हाची झळ नाही सोसवत रं आता,
दे की धाडून त्या पावसाला लवकर
माझ्या उदास भुईची अवस्था नाही बघवत रं आता.
पाण्यासाठी किती मैल चालतील अजून बायका
पायाला फोड आलेत रे, ही पायपीट थांबव की तु आता,
किती परिक्षा घेतोय रे तुझ्या लेकरांची
बरं... परिक्षा नेमकी कधी संपणार, ते तरी सांग की आता.
जीवंतपणी मरणाच्या दारात उभा हाय हा शेतकरी
डोळ्यातील अश्रू ही सुकले की रं आता,
नजर फक्त वरती आभाळाकडंच हाय
कारण, खालचा दुष्काळ नाही बघवत रं आता.
हे देवराया, एका शेतकऱ्याचं
मागणं ऐक की रं आता,
पीकं जळू लागली पाण्यावीन
त्या पावसाला धाड़ की रं आता.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें