बैलपोळा
आज बैलपोळ्याच्या दिनी
बघ येशीच्या वाटेनं,
राजा-सर्जाची जोडी
कशी निघाली जोमानं.
पाठी शोभे रंगीत झालर
गळा शोभे फुल माळ,
पळताना बघा कशी वाजे
पायातली घुंगराची चाळ.
देह सजला रंगांनी
सजली, रंगली शिंगे,
शोभे जणू नवरदेव जेव्हा
सजली डोईवर बाशिंगे.
कामं शेतीची तर रोजच
पण आज दिवस आरामाचा,
खाई रोज गवत-चारा
पण आज नैवेद्य पुरणपोळीचा.
घेतले सात जन्म तरी
नाही फिटणार उपकार,
म्हणून, पोळ्याच्या दिवशी माझ्या जोडीचा
करावा म्हणतोय सत्कार.
उपकारांतून त्यांच्या कधी
नाही होणार मी मोकळा,
पण करेन लाड त्यांचे आयुष्यभर
जरी संपला बैलपोळा.
-अंकिता घुगे.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें