संदेश

खरे दैवत- "आई"

 का जातो मनुष्य राऊळातल्या देवापाशी? जर खरे दैवत आहे त्याच्या स्वतःपाशी. का मनुष्याला कळत नाही, की ज्याच्या शोधात  तो दिवस-रात्र भटकत राही, ते खरे दैवत म्हणजे "आई" . भाग्यशाली असते ती व्यक्ती जिच्या जवळ असते आई , पण दुर्दैवी असतो तो मनुष्य, ज्याला आई ची किंमत कळत नाही. अरे...! राऊळातला देव तरी दगडाचा असतो, पण देवाचा खरा अंश तर आई च्या रूपामध्येच सापडतो. इच्छापूर्ती होण्यासाठी देवाजवळ विनवणी करावी लागते, पण आई ला तर न सांगताच लेकरांच्या मनातील भावना समजते. आई आणि देव यांच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे, आई जवळ असूनही मनुष्य दगडात देव पाहे. आई सारखे दैवत साऱ्या जगामध्ये नाही, आ त्मा आणि ई श्वर यांचा खरा संगम म्हणजे आई.

आपली भेट

 तुम्हाला माहित आहे का...आपली खूप वेळेनंतर होणारी भेट ही कशी असते,  बाकीच्या लोकांचं माहित नाही... पण आपल्यात Wireless Communication थेट असते कितीही त्रास होत असला तरी मला आवडतं तुमची वाट बघायला, कारण मला माहित असतं की कधीतरी तुम्ही येणारच मला भेटायला. आपली भेट ही अशी असते... जणू वाळवंटात आसुसलेल्या जीवाला पाणी मिळते. आपली भेट ही अशी असते... जणू जमिनीवर तडफडत असणार्या माश्याला जीवनदान मिळते. आपली भेट ही अशी असते... जणू चकोराला चंद्राचे दर्शन होते. आपली भेट ही अशी असते... जणू चातकाला पावसाचे पाणी सुखावते. आपली भेट ही अशी असते... जणू उन्हात फिरत असणार्या वाटसरूला गार सावली मिळते. आपली भेट ही अशी असते... जणू तापलेल्या जमिनीवर पावसाची सर कोसळते. थोडक्यात सांगायचं झालं तर...या संपूर्ण जगात सगळ्यात जास्त आनंदी फक्त मीच असते इतकी हृदयस्पर्शी अशी ही आपली भेट असते.

शहर आणि गाव

 शहर म्हणजे सुख सुविधांचा स्वर्ग, गाव म्हणजे हिरवा निसर्ग. शहर म्हणजे प्रदूषणाची दरवळ, गाव म्हणजे माणूसकीची हिरवळ. शहर म्हणजे दूषित माती, गाव म्हणजे जपलेली नाती. शहर म्हणजे बंद दारं, गाव म्हणजे मोकळं सारं. शहर म्हणजे गाड्यांचा धूर, गाव म्हणजे कोकिळेचा सुर. शहर म्हणजे इमारतींचा थवा, गाव म्हणजे मोकळी हवा. शहर म्हणजे तोडलेलं झाड, गाव म्हणजे नारळाचा उंच माड. शहर म्हणजे गर्दी अफाट, गाव म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. शहर म्हणजे डांबरीकरण, गाव म्हणजे स्वच्छ पाण्याचं धरण. शहर म्हणजे दुसर्‍यांचे भाडेकरी, गाव म्हणजे स्वतः शेतकरी. शहर म्हणजे औद्योगिकीकरणाची बोंब, गाव म्हणजे मातीत उगवलेला नाजूक कोंब. शहर म्हणजे पावसाला नकार, गाव म्हणजे पावसाचे उपकार. शहर म्हणजे सोडलेल्या गायी, गाव म्हणजे पाळलेल्या गायी. शहर म्हणजे डिझाईनची दारं, गाव म्हणजे सारवलेली घरं. शहर म्हणजे भाजी-पुरी, गाव म्हणजे बेसन-भाकरी. शहर म्हणजे पैसा कमवणं, गाव म्हणजे समाधानाचं जगणं. शहर म्हणजे संपत्ती, गाव म्हणजे समृद्धी. थोडक्यात... शहर म्हणजे सुख, गाव म्हणजे समाधान.                   ...

मन काय असतं?

 मन काय असतं? एक भावना, एक समज, की, देवाने दिलेला एक मित्र? हे तर नक्की माहित नाही, पण हो.. आपल्या जगण्यात त्याचं महत्त्वाचं असतं पात्र. दिसत तर कुणालाच नसतं, तरीही त्याचं ऐकावं लागतं, त्याच्या एका इशाऱ्यावर ते संपूर्ण शरीराला कामाला लावतं. कुणी म्हणतं "आम्ही मनाचे राजे", तर कुणी म्हणतं "आम्ही मनाचे गुलाम", आपण कितीही प्रयत्न केला थांबवण्याचा तरी नाही लागत त्याच्या फिरण्यावर लगाम. नेहमी सैरभैर भटकत असतं, विचारांचे पाढे मांडत असतं, अदृश्य असूनही ते शरीरावर नेहमीच आपली हुकूमत गाजवत असतं. पण जी गोष्ट मनाने करायची ठरवली तर अशक्य ही शक्य होऊन जातं, त्यासाठी मनाला आपला मित्र बनवावं लागतं जितकी त्याची मैत्री चांगली तितकंच शत्रुत्व महाग पडतं. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल तर मनाचे राजे व्हा, चुकून गुलाम बनलात तर पडेल तुम्हालाच महाग. असो..., मन काय असतं? हे तर नक्की मला माहित नाही, पण हो... देवाने दिलेली ती एक भेट आहे जे सुचवते प्रत्येकाला काही न काही.                                 -अंकिता घुगे.   ...

सुख नेमकं कशात असतं?

 कुणाचं कशात तर कुणाचं कशात असतं, हे सुख नेमकं कशात असतं. "मला इतकंच का मिळालं" हे सुख असतं? की, "मला इतकं मिळालं!" हे सुख असतं? कुणाचं दुसऱ्यांच्या सुखातच सुख असतं, तर कुणी स्वतःला खुश ठेवण्यातच खरं सुख मानतं. कुणाचं सुख पैशाने विकत मिळतं, तर कुणाचं प्रेमाच्या दोन शब्दांतच आयुष्यभराच सुख असतं. कुणी दुसऱ्याने आपल्यावर केलेल्या प्रेमात सुख शोधतं, तर कुणाला स्वतःवर प्रेम करून सुख मिळतं. कुणाला दुसऱ्यांसाठी जगून खरं सुख अनुभवता येतं, तर कुणी "स्वतःसाठी जगणं हेच खरं सुख" असं म्हणतं. या सगळ्या गोष्टींवरून एक मात्र नक्की कळतं, कुणाचं सुख कशात तर कुणाचं कशात, हे ज्याच्या त्याच्या विचारांवर निर्भर असतं. तरीही सुखाची व्याख्या जर शोधली, तर एकचं उत्तर मिळतं, की, खरं सुख हे फक्त समाधानी असण्यातच असतं.                               -अंकिता घुगे.

अनुभव-एक शस्त्र

 जन्माला आल्या आल्या कोणी हुशार होत नाही, आईच्या पोटातूनच कोणी आयुष्याचे धडे शिकून येत नाही. आपण जसे मोठे होत जातो तसं सगळंच हळूहळू कळायला लागतं, वाढत जातात अपेक्षा ही आणि हळूहळू छोटंसं जग मोठं वाटायला लागतं. तुम्ही कितीही ज्ञानी असलात तरीही अनुभवाशिवाय कुठेतरी आयुष्यात कमी पडाल, पण ज्ञानाला जर अनुभवाची जोड असेल तर आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला तोंड देऊ शकाल. अनुभवातून आयुष्याचा खरा अर्थ कळतो अनुभवातून माणसं ही ओळखता येतात, अनुभव एक असं शस्त्र आहे ज्याच्या घावाने दुसऱ्याच्या मनावरील घाव ही कळतात. अनुभव जितके वाढतील ना तितकंच आयुष्याचं कोडं ही सुटत जाईल, या अनुभवासारख्या शस्त्रामुळे  अडचणींचा विळखा ही हळूहळू तुटत जाईल.                               -अंकिता घुगे.

बैलपोळा

 आज बैलपोळ्याच्या दिनी बघ येशीच्या वाटेनं, राजा-सर्जाची जोडी कशी निघाली जोमानं. पाठी शोभे रंगीत झालर गळा शोभे फुल माळ, पळताना बघा कशी वाजे  पायातली घुंगराची चाळ. देह सजला रंगांनी सजली, रंगली शिंगे, शोभे जणू नवरदेव जेव्हा सजली डोईवर बाशिंगे. कामं शेतीची तर रोजच पण आज दिवस आरामाचा, खाई रोज गवत-चारा  पण आज नैवेद्य पुरणपोळीचा. घेतले सात जन्म तरी नाही फिटणार उपकार, म्हणून, पोळ्याच्या दिवशी माझ्या जोडीचा करावा म्हणतोय सत्कार. उपकारांतून त्यांच्या कधी नाही होणार मी मोकळा, पण करेन लाड त्यांचे आयुष्यभर जरी संपला बैलपोळा.                                -अंकिता घुगे.