लहान असताना नेहमी वाटायचं, की केव्हा एकदाचे मोठे होऊ, आणि कधी येईल ते शहाणपण, पण आता मोठं झाल्यावर जाणवतंय, की नको हे जबाबदारीचं ओझं बरं होतं आपलं तेच निरागस " बालपण" . किती मस्ती करायचो, किती खेळ खेळायचो, कधी लपंडाव तर कधी विटी-दांडू, आणि पकडा-पकडी तर बेधुंद होऊन पळायचो. ती शाळेत केलेली निस्वार्थ मैत्री, आणि बाईंच्या छडीला घाबरून केलेला तो अभ्यास, ना कोणत्याही सुख-दुःखाची जाणिव, असायचा फक्त त्या निरागस जीवनाचा ध्यास. ती मित्र-मैत्रिणींसोबत केलेली मस्ती आणि अधूनमधून केलेली ती भांडणं, "ह्यानेचं माझं नाव घेतलं", हे लगेच जाऊन आई बाबांना सांगणं. किती गोड असतात ना या बालपणीच्या आठवणी पण, कितीही आठवल्यात ना तरी कधीच भरत नाही हे आपलं मन. पण मनाला एक आनंद वाटतो, की आम्ही तरी आमचे बालपण जगले, पण आजच्या मुलांचे काय? त्यांचं बालपण तर कुठे तरी हरवून बसलयं कारण, त्यांच्या बालपणापेक्षा जास्त शिक्षणाचे आणि मोबाईलचे वर्चस्व वाढले. -अंकिता घुगे.